चिखली (हॅलो बुलढाणा) आई रेणुका मातेच्या पवित्र यात्रा महोत्सवानिमित्त निघालेल्या भव्य वहन मिरवणुकीत यंदा भक्तीबरोबरच राजकीय शक्तीप्रदर्शनाचीही झलक पाहायला मिळाली. खामगाव चौफुली येथे महायुतीतर्फे करण्यात आलेल्या जोरदार पुष्पवृष्टीने संपूर्ण परिसर भगवामय झाला असून, “युतीधर्म” चा संदेश देत भाजप-शिवसेना एकत्रित ताकद दाखवताना दिसले.
आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या स्वागत सोहळ्याला केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमुळे मिरवणुकीला राजकीय वजन प्राप्त झाले असून, आगामी राजकीय समीकरणांचीही चर्चा रंगू लागली आहे.
पुष्पवृष्टीच्या क्षणी “जय जगदंब” च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वातावरण अक्षरशः भक्तिमय झाले होते. मात्र, या धार्मिक सोहळ्यातून महायुतीने आपली एकजूट दाखवत राजकीय संदेशही स्पष्टपणे दिला.
आमदार श्वेता महाले यांनी आई रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होत सर्व भाविकांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली. दरम्यान, मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, शिवाजीराव देशमुख, ऋषी जाधव, विलास घोलप, सागर पुरोहित यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
एकीकडे भक्तीचा जल्लोष, तर दुसरीकडे राजकीय एकतेचे प्रदर्शन अशा दुहेरी रंगात न्हालेल्या या मिरवणुकीने चिखली शहरात उत्साहाची लाट उसळवली. “महायुती एकसंघ आणि सज्ज” असा ठाम संदेश या सोहळ्यातून देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.










