डोणगाव (हॅलो बुलढाणा/ अनिल राठोड) आज सकाळी निसर्गाने अचानक रौद्ररूप धारण करत डोणगावमध्ये भीतीचं सावट निर्माण केलं. सकाळी सुमारे ७:३० वाजता जोरदार पाऊस आणि विजांच्या कडकडाटात गावातील ग्रामदैवत खंडोबा मंदिरावर थेट वीज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली.
घटनेच्या वेळी मोहन काळे यांच्या आई मंदिरात नेहमीप्रमाणे पूजा करत होत्या. पूजा सुरू असतानाच अचानक आकाशात कडकडाट झाला आणि क्षणार्धात मंदिरावर वीज कोसळली. प्रचंड आवाज आणि लख्ख प्रकाशामुळे परिसर दणाणून गेला. या भीषण घटनेने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
प्रत्यक्षदर्शी संदीप पळसकर, विशाल खोरणे आणि रामा आखाडे यांनी सांगितले की, अचानक आकाशात चमक झाली आणि मंदिराच्या दिशेने जोरदार आवाज झाला. काही क्षणांसाठी सगळेच हादरून गेले.
सुदैवाची बाब म्हणजे, त्या वेळी मंदिरात मोठी गर्दी नव्हती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र मंदिराच्या काही भागाचे किरकोळ नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली. देवाच्या कृपेने मोठा अनर्थ टळल्याची भावना गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.










