बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या जीवनावर उमटू लागले असून बुलढाणा अर्बनच्या तिरुपती येथील भक्तनिवासालाही याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर 7 सप्टेंबर 2007 पासून सुरू असलेली आणि दररोज 800 पेक्षा अधिक भाविकांच्या जेवणाची व्यवस्था करणारी कॅन्टीन आज 17 मार्च 2026 पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला केवळ 25 भाविकांसाठी सुरू झालेली ही सेवा आज मोठ्या प्रमाणात विस्तारली होती. मात्र, गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे ही सेवा ठप्प झाली आहे.
या अचानक निर्णयामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी परिस्थिती लवकर सुधारेल आणि कॅन्टीन पुन्हा सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.










