बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पवित्र रमजान महिन्यात बुलढाण्यातील ६ वर्षीय मदीहा फिरदोस आणि ८ वर्षीय अयमन फिरदोस या बहिणींनी १ मार्च रोजी आयुष्यातील पहिला रोजा धरत समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले. सायंकाळी इफ्तारवेळी त्यांनी भारतात शांती नांदावी तसेच इराण-इस्राएल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळावा, यासाठी विशेष दुआ केली.
कमी वयात धार्मिक कर्तव्य पार पाडताना देशासाठी एकात्मता आणि जगासाठी शांततेचा संदेश देणाऱ्या या दोन्ही चिमुकल्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अयमन आणि मदीहा या बुलढाण्यातील पत्रकार कासिम शेख यांच्या कन्या आहेत.
रमजान हा इस्लामिक दिनदर्शिकेतील नववा आणि अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात रोजा, इबादत, दानधर्म आणि आत्मशुद्धीला विशेष महत्त्व असते. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न-पाणी त्यागून आत्मसंयम साधण्याचा संदेश रोज्यामधून दिला जातो.
दरम्यान, मोहल्ल्यात लहान मुलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत वातावरण उत्साहपूर्ण झाले. अयमन-मदीहाच्या शांतीसंदेशाने बुलढाण्यात सकारात्मक चर्चा रंगल्या आहेत.












