जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील उमापुर येथे प्रेमविवाहाच्या रागातून संतप्त नातेवाईकांनी थेट घरावर हल्ला चढवत दहशत माजविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हरीलाल तुळशिराम जामुनकर यांनी २२ फेब्रुवारी रोजी पुणे येथे शारदा डावर हिच्यासोबत कोर्ट मॅरेज केल्यानंतर वादाला तोंड फुटले. या विवाहाचा राग मनात धरून २७ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास १५ ते २० जणांचा जमाव लाठ्या-काठ्या घेऊन जामुनकर यांच्या घरासमोर दाखल झाला.
आमची मुलगी परत द्या अशी धमकी देत जमावाने थेट घरावर दगडफेक सुरू केली. त्यानंतर त्यांनी घरात घुसून घरातील साहित्याची तोडफोड करत अक्षरशः उच्छाद मांडला. या हल्ल्यात अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
हल्लेखोरांनी केवळ मालमत्तेची तोडफोड करून थांबले नाहीत, तर घरातील महिलांनाही लक्ष्य केले. परमीला जामुनकर आणि बबीता जामुनकर यांना चापटा, बुक्क्यांसह काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघी जखमी झाल्या असून कुटुंबावर भीतीचे सावट पसरले आहे.
यावेळी शेतात कसे जाता ते पाहतो, तुमच्यातील एकाला संपवू अशा जीवघेण्या धमक्या देण्यात आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.घटनेनंतर कुटुंब भीतीने गप्प बसले होते. मात्र दुसऱ्या दिवशी धाडस करून त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली असून गुन्हे दाखल झाले आहे.










Total Users : 3290567