रायपूर (हॅलो बुलडाणा/ सचिन जयस्वाल) गावात सध्या अक्षरशः दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पिसाळलेल्या कुत्र्याने गावात थैमान घातले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा कुत्रा गावशिवारात मुक्तपणे फिरत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत या कुत्र्याने किमान तीन जणांवर हल्ला करून चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जखमींमध्ये फिरोज बेग शब्बीर बेग, राजीक शहा आयुब शहा आणि सुजाता राजेंद्र सरकटे (सर्व रा. रायपूर) यांचा समावेश असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मिळाली आहे.
विशेष म्हणजे, हा पिसाळलेला कुत्रा अजूनही मोकाट फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. ग्रामस्थांच्या मते, संबंधित प्रशासनाने तात्काळ कारवाई करून या धोकादायक कुत्र्याचा बंदोबस्त करणे अत्यावश्यक आहे.
वृत्त लिहेपर्यंत कुत्र्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी पशुवैद्यकीय विभाग व स्थानिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी तीव्र मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.












