मोताळा (हॅलो बुलडाणा/ शिवाजी मामलकर) तालुक्यातील पोफळी गाव आज अक्षरशः हादरून गेलं आहे. किरकोळ भांडणाच्या कारणावरून एका ३२ वर्षीय तरुणाची लाठ्याकाठ्यांनी आणि लोखंडी हत्यारांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या क्रूर हल्ल्यामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत ऊर्फ गणेश निवृत्ती सुरडकर (वय ३२) याला गावातीलच पाच जणांनी एकत्र येत पोफळी शिवारातील विलास राजाराम चौधरी यांच्या शेतात २७ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास गाठले. जुने वाद आणि किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या भांडणाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले.
आरोपींनी अनिकेतवर लाठ्या, काठ्या आणि लोखंडी आसऱ्याने डोक्यावर, मानेवर, छातीवर, पाठीवर, गळ्यावर आणि पायांवर सपासप वार करत अमानुष मारहाण केली. हा हल्ला इतका निर्दयी होता की अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. गावातीलच आणि एकाच समाजातील असलेल्या या व्यक्तींमध्ये पूर्वीपासून किरकोळ वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणी मयताचा चुलत भाऊ विजय आमराव सुरडकर (वय ३८) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून ब्रम्हानंद ऊर्फ धम्मा राजाराम सुरडकर, लकी ऊर्फ प्रफुल्ल संतोष इंगळे, कृणाल जानराव सुरडकर, निलेश बाळ बोदडे आणि क्रिष्णा रमेश अंभोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला असून पुढील तपास ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.












