जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील सुनगाव येथे अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ग्रामपंचायतमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेला 29 वर्षीय गणेश उर्फ लखन राजू मिरटकार याने शेडमधील लोखंडी पाइपाला मोटारसायकलच्या वायरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी उघड झाली.
मृतकाची आई सौ. शोभा मिरटकार यांनी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे दिलेल्या तोंडी फिर्यादीनुसार, गावातीलच रवि नारायण धुळे हा “सोन्याच्या गिन्न्या सापडल्या असून त्यातील हिस्सा दे, अन्यथा खोटी तक्रार करून नोकरी घालवीन” अशी धमकी देत सातत्याने त्रास देत होता. या सततच्या मानसिक छळाला कंटाळूनच गणेशने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे सुनगाव परिसरात संतापाची लाट उसळली आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.











