spot_img
spot_img

संगम चौकात एटीएम कार्ड अदलाबदल टोळी सक्रिय? ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून ५० हजार लंपास; बुलढाण्यात खळबळ!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील संगम चौक परिसरात पुन्हा एकदा एटीएम फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून अज्ञात आरोपीने हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून तब्बल ५० हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाले आहे.

फिर्यादी मुकुंद जगदेव धुंदाळे (वय ६५, रा. महात्मा फुले नगर, सोळंके ले-आऊट, बुलढाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० ते १२.०० दरम्यान स्थानिक संगम चौक येथील ICICI Bank च्या एटीएम मशीनवर ते पैसे काढण्यासाठी गेले होते. पहिल्या प्रयत्नात रक्कम न निघाल्याने त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अज्ञात व्यक्तीने मदतीच्या बहाण्याने कार्ड हातात घेऊन चलाखीने दुसरे कार्ड देत अदलाबदल केली.

घरी परतत असतानाच त्यांच्या मोबाईलवरून खात्यातून रक्कम काढल्याचे संदेश येऊ लागले. सुरुवातीला ३० हजार रुपये काढल्याची माहिती मिळाली; मात्र बँक स्टेटमेंट तपासल्यानंतर एकूण ५० हजार रुपये काढल्याचे स्पष्ट झाले. संबंधित खाते Bank of Maharashtra मुख्य शाखा औरंगाबाद येथे असल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे आरोपीने अशाच पद्धतीने नांदेड जिल्ह्यातील हादगाव येथे दुसऱ्या व्यक्तीलाही ६० हजारांचा गंडा घातल्याची माहिती पुढे आली आहे. यावरून ही एखाद्या टोळीची संगनमताने केलेली कारवाई असावी, असा संशय व्यक्त होत आहे.

या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कायम गुन्हा क्रमांक १५१/२०२६, कलम ३१८(४) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!