चिखली (हॅलो बुलडाणा) शहरातील राजा टॉवर परिसरात ज्येष्ठ पत्रकार अनिल केशवराव पळसकर (वय ७७) यांना भररस्त्यात शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना काल १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:५५ वाजता घडली. याप्रकरणी आरोपी अमर गोविंद भाकरे याच्याविरोधात चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाकरे याने त्याची अल्टो ८०० ही कार रस्त्याच्या मध्यभागी उभी करून वाहतूक कोंडी केली होती. यावेळी पळसकर यांनी गाडी साइडला लावण्यास सांगितल्याने संतप्त झालेल्या भाकरे याने भररस्त्यात अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता तुला पाहून घेतो अशी धमकी देत कार मोटारसायकलवर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पत्रकारांना उद्देशून तुम्ही कोणत्याच कामाचे नाही अशी अवमानकारक वक्तव्ये करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने पत्रकार संघटनांत संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार विजय प्रकाश गीते करीत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.











