बुलढाणा (हॅलो बुलढाणा/ इम्रान खान) बुलढाणा-अजंठा महामार्गावरील निवांत धाब्याजवळ आज सायंकाळी सुमारे ६.३० वाजता सुमारास भीषण अपघात घडला. देऊळघाटकडे जात असलेले शेख तौसिफ (वय ३७, रा. जळगाव, खानदेश) आणि शेख रियाज हे बुलेट दुचाकीवरून प्रवास करत असताना मागून आलेल्या मारुती इकोने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात शेख तौसिफ यांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सदर इको वाहन शाळेतील सहा ते सात विद्यार्थ्यांना घेऊन देऊळघाटकडे जात होते. वाहनचालक गोविंदा तुकडोजी पसरटे हा मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचा आरोप घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी केला आहे. शाळकरी मुलांचे प्राण धोक्यात घालून बेदरकार वाहन चालवणाऱ्या चालकावर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
अपघातानंतर महामार्गावर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. निष्पाप कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.










