spot_img
spot_img

छत्रपती संभाजी महाराजांच्या दूधआईवर आधारित ‘धाराऊ’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा, पण इतिहासाच्या पानांत दुर्लक्षित राहिलेला अध्याय आता रुपेरी पडद्यावर साकार होणार आहे. ‘धाराऊ’ हा आगामी मराठी चित्रपट शंभूराजांच्या दूधआई धाराऊ अक्का गाडे यांच्या निस्वार्थ मातृत्वाची आणि त्यागाची गौरवगाथा मांडणार आहे.

पुण्याजवळील कापूरहोळ गावच्या धाराऊ यांनी सईबाईंच्या निधनानंतर अवघ्या दोन वर्षांच्या शंभूराजांचे संगोपन केले. आईच्या मायेपासून वंचित राहू न देता, त्यांनी शंभूराजांना स्वतःचे दूध पाजून जीवनदान दिले.त्यांच्या या अमूल्य सेवेची दखल घेत शिवाजी महाराजांनी धाराऊंना दरवर्षी 26 होन मानधन देण्याचा सन्मान केला होता.

बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस प्रस्तुत आणि मनीष सुरेश शिंदे दिग्दर्शित ‘धाराऊ’ चित्रपटात हा प्रेरणादायी इतिहास प्रभावीपणे उलगडण्यात येणार आहे. निर्माते श्री. राधेश्याम चांडक (भाईजी), डॉ. सुकेश झंवर आणि कोमल झंवर आहेत. पुरंदर किल्ल्यावर 14 मे 1657 रोजी झालेल्या शंभूराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या बालपणातील संघर्षांचा ऐतिहासिक संदर्भ चित्रपटात मांडण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, ‘छावा’ या हिंदी चित्रपटातही धाराऊंची भूमिका नीलकांती पाटेकर यांनी साकारली होती. ‘धाराऊ’ चित्रपटामुळे मराठा इतिहासातील या मातृछायेला योग्य तो सन्मान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!