मोताळा (हॅलो बुलडाणा) देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह रंगून असताना मोताळा तालुक्यातील मोहेगाव गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान मुख्याध्यापक दिलीप राठोड यांना अचानक हार्ट अटॅक आला आणि त्यांचे दुर्दैवी निधन झाले.
२६ जानेवारी सकाळी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी एकत्र आले होते. आनंदाचे वातावरण असताना, मुख्याध्यापक राठोड यांनी ध्वजारोहणासाठी पुढे येताच अचानक त्यांना अस्वस्थता जाणवू लागली. काही क्षणातच ते कोसळले, आणि उपस्थित शिक्षकांनी व ग्रामस्थांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गाव हळहळेत डुंबले आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक क्षणातच आनंदाच्या जागी दुःखाचे सावट पसरले, तर शिक्षक आणि ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला. ध्वजारोहणाच्या आनंदात अचानक आलेल्या या अनर्थाने गावात शोककळा पसरली आहे.
मुख्याध्यापक राठोड हे शिक्षण क्षेत्रात आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कार्याची, अनुशासनाची आणि विद्यार्थ्यांवरील प्रेमाची गावातील सर्वजण प्रशंसा करत होते. त्यांच्या अचानक निधनाने शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये रिक्तता निर्माण झाली आहे.
गावातील ग्रामपंचायत तसेच शिक्षण विभागाने या दुर्दैवी घटनेबाबत शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या आनंदात आलेला हा दु:खद प्रसंग शिक्षणविश्व आणि गावकऱ्यांसाठी चिंतेचा आणि हळहळेचा विषय बनला आहे.










