खामगाव (हॅलो बुलडाणा) राज्य शासनाने शाळांमधील विद्यार्थी सुरक्षेसाठी नियम, मार्गदर्शक सूचना आणि जबाबदाऱ्या ठरवून दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या कागदावरच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणित चुकल्याच्या रागातून शिक्षकाने अवघ्या साडेनऊ वर्षांच्या चौथीतील विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पवन इंगळे (वय ९½) असे या चिमुकल्याचे नाव असून वर्गशिक्षक रवींद्र चीम यांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे. ही मारहाण इतकी क्रूर होती की पवनला थेट खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करावे लागले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर की मुलांवर अत्याचार होण्याचं केंद्र, असा संतप्त सवाल या घटनेमुळे उपस्थित होत आहे.
१३ डिसेंबर रोजीच राज्य शासनाने विद्यार्थी सुरक्षेबाबत कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. मात्र त्या सूचनांची पायमल्ली करत शिक्षकाकडून थेट शारीरिक अत्याचार झाला तरी ना तात्काळ गुन्हा दाखल, ना निलंबन, हे प्रशासनाचं अपयश नाही तर काय?
पिंपळगाव राजा पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी विद्यार्थ्याला रुग्णालयात पाठवले असून वैद्यकीय अहवालानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रश्न असा आहे की, लहान मुलाला मारहाण होईपर्यंत वाट पाहायची का?
या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून संबंधित शिक्षकावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. आता पोलीस आणि शिक्षण विभाग खरोखर कारवाई करतात की पुन्हा एकदा ‘चौकशी’च्या नावाखाली प्रकरण दाबले जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.










