खामगाव (हॅलो बुलडाणा) शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा खामगाव तालुका अध्यक्ष माधव मोतीराम पांढरे उर्फ माधव पाटील याच्यावर शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. रामटेक येथील आनंद खंते या शेतकऱ्याने फसवणुकीमुळे आर्थिक संकटात सापडल्याने २ एप्रिल रोजी जंगलात झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. त्याच्या सुसाईड नोटमध्ये माधव पाटील, त्याची पत्नी अंजली पाटील, युनियन बँकेचे मॅनेजर आशीष गोंडाणे व विश्वास लाबघरे यांनी संगणमत करून फसवणूक केल्याचा उल्लेख आहे.माधव पाटील यांनी शेतकऱ्यांना शेडनेट हाऊससाठी सबसिडीसह कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली. कर्जाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या नावाने मंजूर करून ती रक्कम त्यांच्या स्वतःच्या किंवा पत्नीच्या फर्मच्या खात्यात वळती केली. शेडचे साहित्य देण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात काहीही न देता शेतकऱ्यांना टोलवाटोलवी केली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी देखील नियम धाब्यावर बसवून कर्ज वितरीत केले.
फसवणुकीमुळे त्रस्त झालेल्या आनंद खंते यांच्यावर कर्ज भरण्याचा तगादा लावला जाऊ लागल्याने त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर माधव पाटील याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रामटेक पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला मोठ्या नेत्यांसोबत फोटो काढून बँक अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आर्थिक व्यवहार करणारा माधव पाटील, अल्पावधीतच महागड्या गाड्यांमधून फिरू लागल्याने त्याच्यावर संशयाची सुई फिरली होती. आता हा सर्व प्रकार उघड झाला असून, जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. क्रमशा