चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) चिखली शहराची जीवनवाहिनी असलेली जांबवंती नदी आज गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. राहुल दिलीप चवरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर थेट बोट ठेवत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
गेल्या काही वर्षांत जांबवंती नदीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शहरातील प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने पाणी पूर्णतः दूषित झाले आहे. याच घाण पाण्याचा प्रवाह पेणटाकळी धरणात मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे. नदीपात्रात प्लास्टिक आणि घनकचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधी आणि डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
नदीतील गाळ साचल्यामुळे पावसाळ्यात जुन्या चिखली भागात वारंवार पूरस्थिती निर्माण होते. तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. “नदी वाचवा, शहर वाचवा” अशी भूमिका घेत चवरे यांनी नऊ ठोस मागण्या मांडल्या आहेत. यात गाळ काढणे, नदीचे खोलीकरण-रुंदीकरण, STP प्रकल्प उभारणी, वृक्षारोपण, घाट बांधकाम आणि आपली जांबवंती मोहिमेचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, नदीकाठी इको पार्क उभारण्याची मागणी करत शहराच्या सौंदर्यवृद्धीचा मुद्दाही पुढे आला आहे. मात्र, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.











