जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) तालुका महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर असल्याने येथे मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आणि अग्निशस्त्रांची वाहतूक होते. विशेष म्हणजे, या धंद्यांना स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे संरक्षण मिळत असल्याची चर्चा आहे. पोलिसांची भूमिकाही संशयास्पद वाटते, कारण मोठे गुटखा व्यापारी सुटतात आणि वाहतूक करणारेच आरोपी ठरतात.२ मार्च रोजी मध्यप्रदेशहून नांदुऱ्याकडे जाणारी मालवाहू बोलेरो पिकअप (क्रमांक MH 48 AY 3421) जळगाव जामोद मार्गे वेगाने जात असताना एका नागरिकाला धडकली. संतप्त नागरिकांनी मानेगाव येथे गाडी अडवली असता त्यात मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याचे आढळले. नागरिकांनी त्वरित पोलिसांना कळवले. जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीसह सुमारे २०.४४ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.
मात्र, खरी धक्कादायक बाब म्हणजे मुख्य सूत्रधारांना अभय देत फक्त वाहनचालकालाच आरोपी बनविण्यात आले. या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड खामगाव येथील मोठा व्यापारी असल्याचे सांगितले जात आहे, तसेच जळगाव जामोद पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याचा यात हात असल्याची चर्चा आहे. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. “चोर सुटला आणि वाहक अडला” अशी स्थिती असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
ही कारवाई ठाणेदार श्रीकांत निचळ, पो.उ.नि. पंकज सपकाळे, नारायण सरकटे व त्यांच्या टीमने केली असून पुढील तपास सपकाळे करीत आहेत. पण, खरे मास्टरमाइंड कधी गजाआड जाणार? पोलीस तस्करांना वाचवतात की शिक्षा करतात? असे प्रश्न जनतेच्या मनात आहेत.