बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात अवैध धंद्यांनी जोर धरला आहे! डोणगाव आठवडी बाजार आणि जानेफळमध्ये सर्रास वरली मटका, ऑनलाईन चक्री आणि जुगार खुलेआम सुरू असून, पोलिसांचा ना धाक आहे ना दरारा! प्रशासनाच्या नजरेसमोरच मटका आणि अवैध धंद्यांचा बाजार तेजीत चालू आहे.अवैध दारू विक्री, गुटखा, लॉटरी, शस्त्रसाठा, अंमली पदार्थ, मसाज पार्लर, वाळू तस्करी आणि बेकायदा प्रवासी वाहतूकसारखे धंदेही बिनधास्त सुरू आहेत. नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस पडत असला, तरी पोलीस कारवाईच्या नावाखाली केवळ दिखाऊ धाडसत्र राबवत आहेत. या धंद्यांचे मूळ उच्चाटन तर दूरच, उलट ते दिवसेंदिवस फोफावत चालले आहेत.
पोलिसांची ही नाकर्तेपणाची भूमिका संशयास्पद आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडत असताना, जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील स्थानिक लोकप्रतिनिधीही केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. लोकांनी कर भरायचा आणि गुन्हेगार मात्र मोकाट सुटायचे का? प्रशासनाचा वचक उरलेला नाही का? अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर संतप्त जनता रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही!
जिल्ह्यातील अवैध धंदे पुन्हा जोमात!
बुलढाणा जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात केलेल्या कारवाईनंतर काही काळ शांतता होती. मात्र, आता पुन्हा अवैध धंद्यांनी जोर धरला आहे. लोकप्रिय आमदार संजय गायकवाड यांनी या संदर्भात विधानसभेत आवाज उठवून कारवाईला गती दिली होती. प्रशासनाने तत्काळ कारवाई करून अनेक ठिकाणी अवैध धंदे बंद केले होते.मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हेच धंदे पुन्हा सुरू झाले आहेत. नागरिकांतून पुन्हा एकदा कठोर कारवाईची मागणी होत आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














