खामगाव (हॅलो बुलडाणा) सोशल मीडियावरील बनावट जाहिरातींच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. खामगावच्या एका महिलेला ‘चेहरा पहचानो और जीतो लाखों का इनाम’ या इंस्टाग्राम जाहिरातीच्या मोहजालात अडकवून तब्बल ₹98,700 गमवावे लागले. या प्रकरणी संबंधित मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तिने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून केली आहे.
काय आहे प्रकरण?
योगिता नामक महिला (वय 29, रा. खामगाव) यांनी 18 नोव्हेंबर 2024 रोजी इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये ‘सलमान खान की अमिताभ बच्चन, चेहरा ओळखा आणि बक्षीस जिंका’ असे पाहिले. त्यांनी उत्तर भरून अर्ज केला आणि काही दिवसांतच त्यांना फोनद्वारे चारचाकी वाहन जिंकल्याची माहिती देण्यात आली. “गाडी हवी नसेल तर 8.50 लाख रुपये खात्यात वर्ग करू,”असे सांगण्यात आले.
यानंतर विविध शुल्कांच्या नावाखाली कधी प्रोसेसिंग फी, कधी जीएसटी, कधी ऑनलाईन टॅक्स अशा वेगवेगळ्या कारणांनी महिलेकडून एकूण ₹98,700 उकळण्यात आले. पैसे दिल्यावरही बक्षीस मिळाले नाही आणि संशय आल्याने त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली.
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा!
सोशल मीडियावर नामांकित व्यक्तींच्या नावाने जाहिराती करून, मोठे बक्षीस लागल्याचा बनाव तयार करून, QR कोडद्वारे पैसे उकळण्याचा हा नवा फसवणुकीचा प्रकार आहे. महिला बँक खात्यात पैसे जमा होण्याची वाट पाहत होती, मात्र शेवटी हा घोटाळा लक्षात आल्यावर तिने सायबर पोलीस ठाणे बुलढाणा येथे मोबाईल क्रमांक 7029471765 धारकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सावध रहा!
सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. मोठे बक्षीस जिंकले असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही अनोळखी फोन कॉलवर विश्वास ठेवू नका. तुमची वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स आणि OTP कोणालाही शेअर करू नका,असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.














