मलकापूर (हॅलो बुलडाणा) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत भाजपच्या दोन गटांमध्ये दोन दिवसांपूर्वी प्रचंड तणाव आणि हाणामारी झाली. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाचे उमेदवार संजय काजळे बिनविरोध सभापती म्हणून निवडून आल्यावर वातावरण पेटले. यानंतर, मलकापूरचे भाजप नेते शिवा तायडे यांच्या गटाने काजळे यांच्यावर सभागृहातच हल्ला चढवला.
ही घटना इतकी गंभीर झाली की, सभागृहातच दोन्ही गट रस्त्यावर उतरल्यासारखे भिडले. हाणामारीच्या या प्रकाराने निवडणूक सभागृह रणांगण बनले. विशेष म्हणजे, हा सगळा प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत घडला. पोलिसांना हस्तक्षेप करून दोन्ही गटांना शांत करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.तणाव इतका वाढला की काही क्षण सभागृहात भयग्रस्त वातावरण तयार झाले होते. या प्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. भाजपच्या अंतर्गत कलहामुळे पक्षाची प्रतिमा मलकापूर परिसरात गालबोट लागल्याचे बोलले जात आहे.
सत्ताधाऱ्यांच्या अशा वर्तनामुळे स्थानिक शेतकऱ्यांत संताप निर्माण झाला असून, या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध केला जात आहे. गटबाजीमुळे राजकारणाची पातळी घसरल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.