बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ती बिचारी वेळेवर येत होती..वेळेवर जात होती..कधी कधी थोडा विलंब व्हायचा! परंतु शालेय विद्यार्थ्यांना शाळेत व कॉलेजमध्ये पोहचून देत होती. तिच्या प्रेमात सगळेच विद्यार्थी पडले होतेच! तिला कोण नाही चाहणार? तिची प्रतीक्षा प्रत्येकांना दररोज राहायची! कधी ती आली नाही तर तिच्या विरहात अनेकजण दुखी व्हायचे! तिला शिव्या शापही द्यायचे! पण तिच्याशिवाय कुणाला करमेना! कारण ती योग्य स्थळी वेळो वेळी ज्याला त्याला पोहोचवायची!आताही पोचवतेच! झाले काय?तर तब्बल 188 विद्यार्थ्यांनी ‘बोगस कार्ड’ बनवून या ‘लालपरीला’ धोका दिला!
या ‘लालपरी’ची कहाणी अशी आहे की,
ती राज्य परिवहन महामंडळाच्या आदेशाने दररोज वेळापत्रकानुसार धावते..विद्यार्थी असो किंवा जेष्ठ..दिव्यांग किंवा अन्य प्रवासी त्यांना त्यांच्या ठिकाणी नेऊन देण्याचे आणि परत आणून देण्याचे कामही करते.. परंतु नियमानुसार या लालपरीचा प्रवास करायचा असेल तर तिकीट काढावे लागते.ते सर्वच काढतात..आणि प्रवास करतात.. लालपरीने शासकीय योजनेतून काही घटकांना सवलत दिली आहे. ज्येष्ठांना मोफत प्रवास तर महिलांना 50 टक्के सूट देण्यात आली.विद्यार्थ्यांसाठी देखील सवलत योजना लागू आहे.सवलत देऊनही,काही चिखली-मेहकर तालुक्यातील तब्बल 188 विद्यार्थ्यांनी लालपरीची मस्करी करत, तिचीही दिशाभूल केली आहे.हे विद्यार्थी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून प्रवास करत होते. या बोगस कार्डधारक विद्यार्थ्यांना पकडण्यात आलं आहे.तुम्ही म्हणाल कसे? तर ऐका..बुलढाणा विभागात विद्यार्थी पासेसची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती.त्यामुळे याचा शोध घेण्यात आला. आगारप्रमुख, चालक-वाहक संबंधीत यांच्याशी चर्चा करण्यात आली.या चर्चेतून दिव्यांग बोगस कार्ड जास्त आहेत आणि त्या कार्डावरून मोफत प्रवास करत आहेत,विद्यार्थी पासेसच काढत नाहीत,असे लक्षात आले. त्यानंतर तपासणी मोहीम सुरू झाली.तब्बल 188 डुप्लिकेट दिव्यांग कार्ड जप्त आले. या बोगस पासधारक विद्यार्थ्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी समज दिली. पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करू असा इशाराही देण्यात आला.सदर प्रकार चिखली-मेहकर, देऊळघाट ,धाड या मार्गावर सुरू असून,भरारी पथकांना या मार्गावर कार्यान्वित करण्यात आले आहे,अशी माहिती ‘हॅलो बुलढाणा’ला विभागीय वाहतूक अधिकारी दिगंबर जाधव यांनी दिली आहे.