जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) तालुक्यात महावितरणच्या गलथान कारभाराचा पहिला बळी गेल्याचा संतापजनक प्रकार खेर्डा खुर्द येथे समोर आला आहे. संकेत प्रभाकर वेरुळकर वय 20 वर्षे या तरुणाचा विजेच्या खांबाच्या ताणाला स्पर्श झाल्याने जोरदार विद्युत धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला. दिनांक 26 जून रोजी दुपारच्या सुमारास वनुर शिवारातील गट नंबर 85 मध्ये पेरणीचे काम सुरू असताना ही हृदयद्रावक घटना घडली.
उपस्थित नागरिकांनी संकेतला तातडीने जळगाव जामोद येथे उपचारासाठी नेले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. संकेत आर्मी भरतीची तयारी करत होता. ग्राउंड पास करून लेखी परीक्षेच्या उंबरठ्यावर असलेल्या या तरुणाचे स्वप्न महावितरणच्या निष्काळजीपणामुळे कायमचे संपल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
घटनेनंतर परिसरात संताप उसळला असून, पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पावसाळ्यात लोंबकळणाऱ्या तारा, जीर्ण पोल, उघडे डीपी जीवघेणे ठरत असतानाही महावितरण झोपेतच असल्याचा आरोप नागरिकांनी केला. राष्ट्रवादीचे रंगराव देशमुख, काँग्रेसचे अविनाश उमरकर, डॉ. संदीप वाकेकर यांनी महावितरणचा तीव्र निषेध करत आठ दिवसांत धोकादायक पोल व वाहिन्या दुरुस्त न झाल्यास महावितरण कार्यालयात अनोखे आंदोलन करण्याचा इशारा दिला.











