spot_img
spot_img

‘समृद्धी’वर डिझेल चोरांची टोळी गजाआड! – दोन वाहने जप्त

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) गत दोन वर्षांत लहान मोठ्या अपघातामुळे गाजणाऱ्या हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्ग वाढत्या गुन्हेगारीमुळे देखील वादग्रस्त ठरत आहे. समृद्धी महामार्गावरील डिझेल चोरीच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे.

लोणार तालुक्यातील बीबी पोलिसांनी केलेल्या कारवाईत ही बाब ठळकपणे सिद्ध झाली आहे. बीबी पोलीस ठाण्याच्या पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील चौघा आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी इंधन चोर टोळीने चोरलेले डिझेल खरेदी करणारा निघाला आहे.

दरम्यान या घटनेचा चंद्रपूर जिल्ह्याशी सबंध आहे. चंद्रपूर येथील कल्याणी टॉवर येथील किरण कुमार लिंगया कनुकुंटल (३८) हे या घटनेचे फिर्यादी आहेत. किरणकुमार हे मागील १३ नोव्हेंबर २०२४ रोजी ट्रकने
समृद्धी मार्गावरून मुंबई येथून नागपूर कडे जात होते. लांबचा प्रवास असल्याने त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी वरील दुसरबीड टोल नाक्याजवळ आराम करण्यासाठी आपले मालवाहू वाहन थांबविले. ते गाढ झोपेत असताना त्यांच्या वाहनातील पाऊण लाख रुपये किंमतीचे डिझेल अज्ञात चोरांनी लंपास केल्याचे आढळून आले. तसेच वाहनाची समोरील काच फोडल्याचे दिसून आले. प्रकरणी
किरण कुमार लिंगया कनुकुंटल यांनी बीबी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली. यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३२४(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

▪️असा लागला छडा!
कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना घटनेचा तपास करण्याचे आव्हान ठाणेदार संदीप पाटील, त्यांचे सहकारी परमेश्वर शिंदे, अरुण सानप, रवींद्र बोरे यांनी यशस्वी रित्या पेलले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण च्या आधारे त्यांनी आरोपींचा छडा लावला. यानंतर २० डिसेंबर रोजी चिखली पोलीस हद्दीतील गजानन नगर चौफुली भागात छापा घातला. यावेळी लक्ष्मण उर्फ संतोष गुलाब लहाने (२७, राहणार खंडाला मकरध्वज, तालुका चिखली), निलेश संतोष भारूडकर(३३, राहणार सातगाव भुसारी, तालुका चिखली) आणि देविदास प्रकाश दसरे (२८, राहणार साखर खेरडा, तालुका सिंदखेडराजा) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्या जवळील स्कारपीओ , स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली. तसेच ३५ लिटर क्षमतेच्या ४ प्लास्टिक कॅन देखील जप्त करण्यात आल्या.या तिघांची कसून चौकशी करण्यात आली असता त्यांनी त्यांच्या चौथ्या सहकाऱ्याची माहिती दिली. २१ डिसेंबर रोजी रात्री उशिरा देऊळगाव घुबे येथील रहिवासी आरोपी सचिन परशराम घुबे (२१) याला अटक करण्यात आली.त्याने डिझेल खरेदी केल्याची कबुली दिली. या चौघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!