लोणार (हॅलो बुलडाणा) १७ डिसेंबर परभणी येथील संविधानाच्या अवमानप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूची एसआयटी चौकशी करून न्याय मिळावा, अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला.
१० डिसेंबर रोजी परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाला होता. याबाबत निषेध नोंदवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी यांनी आंदोलन केले, मात्र त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. १५ डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. हा मृत्यू की हत्या याचा तपास एसआयटीद्वारे करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
यासंदर्भात तहसीलदार लोणार यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे, तालुकाप्रमुख ऑड. दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव, युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांसह शिवसेना व महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाच्या वतीने दोषींवर कठोर कार्यवाही व सखोल चौकशीचा आग्रह धरत न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.