बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दि. ४ जुलै जिल्ह्यात पावसाचा जोर पुढील चार दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ४ ते ७ जुलै दरम्यान जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
४ आणि ५ जुलै रोजी जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. काही भागात जोरदार सरी कोसळू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, तर शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानाचा अंदाज पाहूनच करावीत. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली, मोकळ्या मैदानात किंवा विजेच्या खांबाजवळ थांबणे धोकादायक ठरू शकते.
६ आणि ७ जुलै रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली तरी हलका ते मध्यम पाऊस सुरू राहू शकतो. या काळातही विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा धोका कायम राहणार आहे. सततच्या पावसामुळे नदी, नाले, ओढे आणि सखल भागातील पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे पाण्याखाली गेलेले रस्ते, पूल किंवा ओढे ओलांडण्याचा जीवघेणा प्रयत्न करू नये.
दरम्यान, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी १०७७ या जिल्हास्तरीय मदत क्रमांकावर संपर्क साधावा. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.










