spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स ! डॉ.राजेंद्र शिंगणेंच्या प्रवेशाने घाटावरील 4 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला बळ !

साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा /दर्शन गवई) बुलढाणा जिल्ह्यात सहकार लाॅबी मोठी आहे. या सहकार लाॅबीचे नेतृत्व माजीमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडे आहे. त्यामुळे डॉ. शिंगणे सांगतील ती पूर्व दिशा असे समिकरण बघितले तर घाटावरील चार विधानसभा मतदारसंघात त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. याचा फायदा महाविकास आघाडीला बळ देऊ शकतो असे बघितले जात आहे.

बुलढाणा जिल्ह्यात घाटावर बुलढाणा, चिखली,मेहकर आणि सिंदखेडराजा हे चार मतदार संघ येतात.आज बुलढाणा मतदार संघात शिवसेना शिंदे,चिखली भाजपा,मेहकर शिवसेना शिंदे गटाची सत्ता आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ सोडला तर तीन मतदार संघात महायुतीचे आमदार आहेत. या तीन मतदार संघात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर हुकमी एक्का म्हणून डॉ राजेंद्र शिंगणे यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. मागिल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत १४ ते १५ जिल्हा परिषद सदस्य निवडून त्यांनी आणले होते. अनेक पंचायत समिती मध्ये सदस्य निवडून त्यांनी आणले होते. केवळ मराठा समाजापुरते राजकारण न करता सर्व समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. आजही कृषी उत्पन्न बाजार समिती असो, खरेदी-विक्री संघ असो, की सहकारातील अनेक संस्था असो यात इतरांना सामावुन घेण्याची वृत्ती त्यांची राहिली आहे. पक्ष्यांची उमेदवारी दिली की तो कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करणारे एक नेतृत्व या जिल्ह्यात लाभले आहे. आज डॉ राजेंद्र शिंगणे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन उर्वरित तीन मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बळ मिळाले आहे . सहकार महर्षी स्व भास्करराव शिंगणे यांच्या पासून सहकार चळवळ जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले . राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड नाझेर काझी यांनी पक्ष सोडला नसला तरी काल बहुसंख्य कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत शरदचंद्र पवार यांच्या घोषणा देत आपली पुढील राजकीय दिशा ठरवली आहे . शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्षा रेखाताई खेडेकर यांनाही ताकद मिळाली आहे . त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात आपले नवे पर्व सुरु करेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे . मेहकर विधानसभा मतदारसंघात उबाठा शिवसेना गटाकडे सुटलेला आहे . त्यात सिध्दार्थ खरात यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे . चिखली मतदार संघात काॅंग्रेसचे राहुल बोंद्रे फायनल झाले आहेत. तर बुलढाणा मतदार संघात उबाठा की काॅग्रेस यात रस्सीखेच सुरू आहे . त्या सर्वांना डॉ राजेंद्र शिंगणे यांची साथ मिळणार आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि माजीमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे वर्चस्व पणाला लागणार आहे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉ राजेंद्र शिंगणे यांना टक्कर देण्यासाठी ऐकास एक लढत झाली तरच निवडणुकीत चुरस निर्माण होईल. त्यासाठी महायुतीचे घटक पक्ष भाजपा , शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना एकत्र येऊन मोट बांधावी लागणार आहे. यातील एकानेही बंडखोरी केली तर निकाल काय लागतील हे भविष्य कारालाही विचारण्याची गरज पडणार नाही. आज उबाठा गटाचे संभाव्य उमेदवार दिलीप वाघ यांनी गद्दारीच्या कितीही गप्पा केल्या तरी ते बाहेरचे पडतात. पैसा कितीही असला तरी लोकप्रियता कमाविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. केवळ निवडणूक आली की मी उमेदवार ही भूमिका चालत नाही . त्यामुळे मतदार संघातील उबाठा गटाचे कार्यकर्ते उध्दव ठाकरे सांगतिल तो आदेश आम्हाला मान्य राहिल असे एका नेत्याने सांगितले आहे. राहिला काॅग्रेसचा प्रश्र्न त्यांनी अगोदरच डॉ राजेंद्र शिंगणे यांचे नेतृत्व मान्य केले आहे.कु. गायत्री शिंगणे यांना समजाविण्याचा प्रयत्न घरातूनच होईल यात दुमत नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!