साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा/दर्शन गवई) राज्यातील धनगर बांधवांसाठी एस.टी.प्रवर्गातील सर्व सवलतींची अंमलबजावणी त्वरित करावी या प्रमुख मागणीसाठी गत तीन दिवसांपासून नेवासा फाटा येथे ६ धनगर बांधव आमरण उपोषणाला बसलेले असून आजचा उपोषणाचा तिसरा दिवस उलटून ही उपोषणकर्ते उपोषणामंडपात ठाण मांडून आहेत. यांतील प्रल्हाद सोरमारे या आंदोलकाची तब्येत खालावली असून डॉक्टरांनी त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे मात्र सोरमारे यांनी त्यास तीव्र विरोध दर्शवून जोपर्यंत मागण्या सरकार मान्य करत नाहीत तोपर्यंत हे उपोषण असेच चालू राहणार असल्याची भूमिका घेण्यात आली आहे.
या ६ उपोषणकर्त्या पैंकी प्रल्हाद सोरमारे हे साखरखेर्डा चे सुपुत्र असून व्यवसायानिमित्त ते छत्रपती संभाजीनगर ला स्थायिक झालेले आहेत. समाजबांधवांसाठी सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सोरमारे यांची तब्येत खालावली असल्याने दि. २१ सप्टेंबर रोजी साखरखेर्डा ग्रामपंचायत चे मा. उपसरपंच तथा विद्यमान सदस्य संतोष सेठ जयस्वाल, महात्मा गांधी ग्राम तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष मंडळकर, मा. उपसरपंच प्रवीण पाझडे, ग्रामपंचायत सदस्य संग्रामसिंग राजपूत, देवानंद खंडागळे, तलाठी सुमित गवई ह्यांनी उपोषणाला भेट देऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस करुन उपोषणास जाहीर पाठींबा दिला.