बुलढाणा (हॅलो बुलढाणा) वाहनधारकांनो, आता निष्काळजीपणा महागात पडू शकतो! 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट म्हणजेच HSRP बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य परिवहन विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने याबाबत वाहनधारकांना तातडीचे आवाहन केले आहे.
HSRP ही साधी नंबर प्लेट नसून वाहनाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची ओळख आहे. या प्लेटमध्ये क्रोमियम आधारित होलोग्राम, लेझर कोड आणि कायमस्वरूपी लॉकिंग व्यवस्था असते. त्यामुळे बनावट नंबर प्लेट, वाहन चोरी आणि गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवणे प्रशासनाला सोपे होणार आहे.
वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणीनंतर ठरवून दिलेल्या केंद्रावर जाऊन वेळापत्रकानुसार HSRP बसवून घ्यावी लागणार आहे. वाहनाच्या प्रकारानुसार यासाठी शुल्क आकारले जाणार आहे.
प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, निर्धारित मुदतीनंतर HSRP नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे दुचाकी असो, चारचाकी असो किंवा इतर कोणतेही वाहन, HSRP बसविण्यास विलंब करू नका. अधिक माहितीसाठी संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे











