spot_img
spot_img

विधानसभेत आ. खरातांचा कडकडाट! मेहकर रुग्णालयापासून विदर्भाच्या दुग्ध व्यवसायापर्यंत… प्रश्नांचा पाढा मांडत सरकारला धरले धारेवर!

मेहकर (हॅलो बुलढाणा) विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी शेतकरी, दुग्ध व्यवसाय आणि आरोग्य सुविधांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत सरकारचे लक्ष वेधले. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि आरोग्य विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना आ. खरात यांनी शेतकऱ्यांना केवळ शेतीवर अवलंबून ठेवणे धोकादायक असून, त्यांच्या शाश्वत उत्पन्नासाठी दुग्ध व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना देणे अत्यावश्यक असल्याचे ठणकावून सांगितले.

शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर शेतीसोबत पूरक आणि कायमस्वरूपी उत्पन्नाचे स्रोत उभे करावे लागतील. त्यासाठी दुग्ध व्यवसाय हा प्रभावी मार्ग असून राज्य सरकारने दुधाळ जनावरांचे मोठ्या प्रमाणात वाटप करावे, अशी ठाम मागणी त्यांनी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली. विदर्भ आणि मराठवाड्यात दूध उत्पादन वाढीसाठी विशेष धोरण राबविण्याची गरज असल्याचे सांगत, बुलढाणा, वाशीम, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांतील दूध उत्पादन अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

आ. खरात म्हणाले की, विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पासाठी निधी उपलब्ध असतानाही शासनाची गती अत्यंत संथ आहे. मागील अधिवेशनात दिलेली आश्वासने अद्याप जमिनीवर उतरलेली नाहीत. त्यामुळे हा प्रकल्प युद्धपातळीवर राबवून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून द्यावा.

आरोग्य विभागाच्या चर्चेतही आ. खरात यांनी मेहकरच्या आरोग्य प्रश्नांवर जोरदार आवाज उठवला. मेहकर येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या रुग्णालयात तातडीने श्रेणीवर्धन करावे, ट्रॉमा केअर सेंटरमधील रिक्त पदे त्वरित भरावीत, डोणगाव येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करावे आणि सोनाटी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.

ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सरकारने विलंब न करता सकारात्मक निर्णय घ्यावा, असा इशाराच आ. सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत दिला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!