चिखली (हॅलो बुलढाणा/ व्ही. झालटे) ‘पुस्तकं आयुष्याला वळण देतात.अनुभव, विचार, ज्ञान बळकट करून आयुष्य फुलवितात..याची अनुभूती होतीच! इतरही विद्यार्थ्यांचे भविष्य सुकर व्हावे म्हणून नुकत्याच रेल्वे पोलीसमध्ये भरती झालेल्या गजानन आखाडेने आपल्या अंत्री देशमुख येथील राजे संभाजी विद्यालयाला 10 हजार रुपयांची पुस्तके भेट दिली.
पुस्तकांमुळे भविष्यात होणाऱ्या फायद्याने अनेक सुशिक्षित युवकांचे जीवन फुलते, हाच आशावाद अंगी बाळगून गजानन आखाडे या माजी विद्यार्थ्याने आपले सामाजिक दायित्व पार पाडले. गजाननने मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथील राजे संभाजी विद्यालय येथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन नोकरीचा प्रयत्न केला.दरम्यान त्याचे प्रयत्न नुकतेच फळाला आले असून तो रेल्वे पोलीस मध्ये भरती झाला आहे. राजे संभाजी विद्यालय गट वीस वर्षापासून नावारूपास आले आहे.या शाळेतून अनेक विद्यार्थी पोलीस दल, राज्य राखीव दल, बँक मॅनेजर,उद्योजकअशा विविध क्षेत्रात अनेक विद्यार्थी यशस्वी झालेत.आपणही शाळेचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून अनेकांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दान दिले आहे. दरम्यान रेल्वे पोलीस दलात निवड झालेल्या गजानन केशव आखाडे या माजी विद्यार्थ्यांने गावात मिरवणूक किंवा वायफळ खर्च न करता जिथे ज्ञानाचा सागर संचित करून इतरांची वैचारिक भूक भागविल्या जाते,अशा गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान अवगत व्हावे यासाठी 10 हजार रुपयांची पुस्तके भेट दिली आहे. पुस्तकांचा खजिना सर्वांसाठी उपलब्ध झाला आहे.यावेळी संस्थाध्यक्ष संतोष झालटे,संचालक विनोद झालटे,मुख्याध्यापक गजानन कोल्हे,शिक्षक दिलीप तुपकर, संतोष डोंगरे, ज्ञानदेव सोनकांबळे,शिंदे सर,प्राध्यापक पी एस चनखोरे, खरात सर व कर्मचारी उपस्थित होते.














