बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून पेटलेला वाद आता थेट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या गळ्यात येऊन अडकला आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार पलटवार करत गायकवाड यांच्याच प्रतिज्ञापत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या एफिडेविटमध्ये आमदार गायकवाड यांनी आपले शिक्षण ‘शिवाजी हायस्कूल’ बुलढाणा असे नमूद केले आहे.याच मुद्द्यावरून विरोधकांनी विचारले “दुसऱ्यांना शिकवण्यापूर्वी स्वतःच्या कागदपत्रांमध्ये ‘छत्रपती’ किंवा ‘श्री’ असा उल्लेख का केला नाही?”
विशेष म्हणजे, गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत विधानभवनात ‘शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होऊ नये’ यासाठी अनेक वेळा लक्षवेधी लावल्याचा दावा केला होता. मात्र आता त्यांच्या स्वतःच्या प्रतिज्ञापत्रातील उल्लेखामुळे विरोधकांनी त्यांना घेरले आहे.
याहूनही मोठी गोष्ट म्हणजे, गायकवाड ज्या भागात राहतात त्या परिसराचे नावच ‘शिवाजी नगर’ आहे. दोन टर्मचे आमदार आणि नगरपालिकेवर सत्ता असताना त्यांनी या नावात बदल का केला नाही, असा सवालही आता जोर धरू लागला आहे.
एका पुस्तकावरून सुरू झालेला हा वाद आता थेट शालेय टीसी आणि प्रतिज्ञापत्रापर्यंत पोहोचला असून राजकीय वातावरण अधिक तापले आहे. बुलढाण्यात आता “बोलण्याआधी स्वतःकडे पाहा” अशीच चर्चा रंगली आहे.
गायकवाडांचा ‘शिवाजी’ मुद्दा आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीला भारी पडणार का? अशी चर्चा जनतेत निर्माण झाली आहे










