बुलढाणा (हॅलो बुलढाणा) खामगाव येथील वसतिगृहात पुरुष गृहपाल असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, त्यामुळे याबाबत समाज कल्याण विभागाने खुलासा केला आहे.
समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त मागासवर्गीय मुलींची 8 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यापैकी 2 वसतिगृहावर नियमित महिला गृहपाल कार्यरत आहे. उर्वरित 6 वसतिगृहावर कनिष्ठ लिपिक वर्गीय महिला गृहपाल कार्यरत आहे. सदर वसतिगृहावर नियमित महिला गृहपाल अद्यापपर्यंत भरलेले नसल्याने ही पदे रिक्त आहेत.
खामगाव येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये नियमित महिला गृहपाल नसल्याने सदर वसतिगृहाचा तात्पुरता प्रभार खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या नियमित पुरुष गृहपाल डी. बी. बोथिंगे यांच्याकडे सोपविण्यात आला. याबाबत सुरज बेलोकार, रा. खामगाव यांच्या तक्रारीनुसार महिला चौकशी समितीतर्फे मुलींच्या वसतिगृहाची चौकशी करण्यात आली. सदर चौकशी समितीच्या अहवालानुसार काहीही तथ्य नसल्याचे निदर्शनास आले आहे.
तक्रारीच्या अनुषंगाने मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचा प्रभार कनिष्ठ लिपिक वर्गीय महिला गृहपाल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींची दि. 25 ऑगस्ट रोजी भेट घेतली. तसेच विद्यार्थिनींच्या अडचणीच्या अनुषंगाने चर्चा केली. विद्यार्थिनींनी नियमानुसार सर्व सोयी सुविधांचा पुरवठा झाला असल्याचे सांगितले. वसतिगृहाबाबत बदनामीकारक वृत्त प्रसिध्द केले जात असल्याबाबत तक्रार केली. त्यामुळे शहनिशा करून वृत्त प्रकाशित करावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.














