बुलढाणा, (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात विकासाची गती वाढल्याचा दावा करत पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांनी प्रशासनाला आणि नागरिकांना थेट संदेश दिला.योजना फक्त कागदावर नकोत, त्या जमिनीवर उतरल्या पाहिजेत! पोलिस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला.
कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाची चाकं वेगाने फिरत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. मात्र, या योजनांचा खरा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतोय का, हा प्रश्नही नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय.
दरम्यान, पोलीस विभागाच्या तब्बल २७ नवीन वाहनांचे उद्घाटन करून कायदा-सुव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात १६ हजार कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. बुलढाण्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ८९३ कोटींची मदत जमा झाली आहे. या मदतीवर कोणतीही बँक वसुली होणार नाही, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले.
तसेच, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत २ लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देऊन सरकार त्यांचा सन्मान करणार असल्याचेही त्यांनी ठणकावले.











