बुलढाणा (हॅलो बुलढाणा/ प्रशांत खंडारे) आभाळात जसा अजूनही पाऊस दाटलेला आहे तसा जिल्ह्यातील 683 शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखील ‘पाऊस’ दाटलाय! गेल्या चार दिवसात पाऊस असा बरसला की,जिल्ह्यातील 47 गावांना पीक नुकसानीचा तडाखा बसून 495 हेक्टरवरील शेतीवर पाणी फेरल्या गेले.
21 ते 24 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात पाऊस बरसला. पावसामुळे 47 गावांतील 683 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. यामध्ये 341 हेक्टर क्षेत्रावरील पीक बाधित झाले तर 154 हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. तब्बल 495 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. जिल्ह्यातील सर्वाधिक नुकसान जळगाव जामोद तालुक्यातील 19 गावामध्ये झाले. त्या पाठोपाठ मोताळा तालुक्यातील 10 गावांमध्ये शेती उध्वस्त झाली असून 290 शेतकरी नुकसानग्रस्त झालेत.मेहकर तालुक्यातील 200 शेतकऱ्यांवर नुकसानीचे संकट ओढावले.बुलढाणा, मलकापूर , खामगाव आणि नांदुरा येथेही शेती पिकांची नासाडी झाली.पाऊस तसा तारक आहे पण कधी कधी तो मारक ठरतो.गेल्या चार दिवसात पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला.धरणे ओव्हर फ्लो झाले. पुराचे पाणी शेतात घुसले. त्यात पिके आणि शेतातील जमीन अक्षरशः खरडून गेली. पावसामुळे सोयाबीन,कापूस मुगासह ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर पिकं तर गेलीच गेली पण त्याबरोबर जमीन देखील खरडूनगेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.














