spot_img
spot_img

BREAKING! जळगाव जामोदच्या जंगलात दोन बिबटे मृत! झुंज ठरली जीवघेणी? अंतिम अहवाल उलगडणार मृत्यूचं कारण!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) एकाच जंगलात दोन बिबटे मृतावस्थेत! चालठाणा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ६२३ मध्ये २१ नोव्हेंबर रोजी ही घटना उघडकीस आली. वनरक्षक कु. आर. के. राऊत वनमजुरासह गस्तीवर असताना दोन्ही बिबट्यांचे मृतदेह आढळले. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून वनगुन्हा नोंदविला आहे.

वनअधिकारी आणि पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही बिबट्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. आपसातील झुंजीमुळे मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी निष्कर्ष असले, तरी अंतिम कारणावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. शास्त्रोक्त पद्धतीने नमुने संकलित करण्यात आले असून, ते अमरावतीच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येत असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

दोन्ही मृतदेहांची निर्धारित कार्यपद्धतीनुसार विल्हेवाट लावण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे तपास करीत आहेत.

दरम्यान, अफवांवर विश्वास ठेवू नका, अपुष्ट माहिती पसरवू नका, असे आवाहन वनविभागाने केले आहे. जंगलालगत वावरताना खबरदारी घ्यावी; वन्यप्राणी दिसल्यास जवळ न जाता १९२६ या क्रमांकावर माहिती द्यावी.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!