मलकापूर (हॅलो बुलढाणा/करन झनके) वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता ठेवायचा की त्यातून गरजूंच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करायचा? बेलाड येथील शिवशंकर संभारे आणि हेमलता संभारे यांनी आपल्या कृतीतून याचे प्रभावी उत्तर दिले आहे. मुलगा अव्यय याच्या वाढदिवसानिमित्त दोघांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.
बुधवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ रोजी मलकापूर येथील जीवन ज्योती ब्लड बँकेत संभारे दाम्पत्याने रक्तदान केले. वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी काहीतरी करण्याचा संकल्प त्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवला. कुटुंबातील आनंदाच्या क्षणाला सेवाभावाची जोड देणारा हा उपक्रम लक्षवेधी ठरला.
या उपक्रमासाठी हनुमान सेनेने मोलाचे सहकार्य केले. यावेळी हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ टप, ॲड. सचिन देशमुख, पत्रकार करण झनके, गौरव संभारे, प्रवीण खर्चे आदी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत संभारे दाम्पत्याने रक्तदानाचा संकल्प पूर्ण केला.
समाजकार्यात अग्रेसर असलेल्या संभारे कुटुंबीयांनी मुलाच्या वाढदिवसाला दिलेले हे सामाजिक वळण इतरांसाठीही प्रेरणादायी आहे. वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव आणि जल्लोष एवढेच समीकरण नसते; तो समाजाच्या उपयोगी पडण्याचाही दिवस ठरू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले.लेकाच्या वाढदिवशी आई-बाबांनी केलेले रक्तदान ही समाजाप्रती जपलेल्या संवेदनशीलतेची ठोस कृती आहे. आनंद साजरा करतानाच सामाजिक जबाबदारी निभावण्याचा संदेश या उपक्रमातून मिळाला. अव्ययच्या वाढदिवसाची ही आठवण सेवाभावामुळे विशेष ठरली





Total Users : 3717352