spot_img
spot_img

दिवाळीचा बाजार घेऊन निघाला घरला… पोटात गडबड, गडी गेला ‘दोन नंबरला’! चोरट्याने डाव साधला… गाडीसकट बाजारच उचलला! नांदुऱ्यात पंधरा मिनिटांत दुचाकी, मोबाइल अन् खरेदीच्या पिशव्या गायब; ६० हजारांचा फटका!

नांदुरा (हॅलो बुलढाणा) दिवाळीसाठी बाजार केला, कपडे घेतले अन् गावाकडे परतीचा प्रवास सुरू झाला. मात्र, वाटेत पोटात गडबड झाल्याने घेतलेला पंधरा मिनिटांचा विराम चांगलाच महागात पडला! चोरट्याने दुचाकीसोबत मोबाइल आणि खरेदीच्या पिशव्याही लंपास केल्याची घटना बेलाड येथील गजानन महाराज मंदिराजवळ घडली.

खांडवी येथील शेतकरी अजय रमेश सारोकार (वय २८) हे सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी दिवाळीचा बाजार व कपडे खरेदीसाठी नांदुऱ्यात आले होते. दुपारी दोनच्या सुमारास घरी परतताना पोटात त्रास जाणवल्याने त्यांनी मंदिराजवळ दुचाकी थांबवली. ओप्पो मोबाइल आणि खरेदीच्या पिशव्या गाडीलाच ठेवून ते शौचासाठी बाजूला गेले.

सुमारे पंधरा मिनिटांनी परतले, तर गाडीच्या जागी मोकळी जागा! दुचाकी नाही, मोबाइल नाही आणि दिवाळीचा बाजारही नाही! त्यांनी परिसरात व गावात शोधाशोध केली; मात्र काहीच हाती लागले नाही.

दुचाकी फायनान्सवर घेतलेली असून हप्ते बाकी असल्याने त्यांनी संबंधित कंपनीशीही संपर्क साधला. मात्र, कंपनीने गाडी नेली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे चोरी झाल्याच्या तक्रारीसाठी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

तक्रारीनुसार, अंदाजे ५० हजार रुपयांची दुचाकी, १० हजारांचा मोबाइल व सोबतचे सामान चोरीला गेले. ३ नोव्हेंबर रोजी नांदुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या पंधरा मिनिटांत घडलेल्या या प्रकाराने सारोकार यांच्या दिवाळीच्या खरेदीच्या आनंदावर मात्र विरजण पडले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!