धाड (हॅलो बुलढाणा) सणासुदीचा आनंद लुटण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर पडताय? मग घराच्या सुरक्षेचीही व्यवस्था करा! बंद घरांमध्ये चोरी आणि घरफोडीची शक्यता लक्षात घेता धाड पोलिसांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
बाहेरगावी जाताना विश्वासू शेजाऱ्यांना कल्पना द्या. दीर्घकाळ घर बंद राहणार असल्यास पोलिसांनाही माहिती द्या. दरवाजांना मजबूत कडी-कोयंडे आणि दर्जेदार कुलपे लावा. घराबाहेर प्रकाशव्यवस्था ठेवा, नाईट व्हिजन सीसीटीव्ही बसवा. सोने-चांदी, दागिने आणि रोकड घरातील कपाटात ठेवण्याऐवजी शक्यतो बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवा.
गावाबाहेरील घरमालकांनी विशेष दक्षता घ्यावी. शक्यतो सर्व सदस्यांनी एकाच वेळी बाहेरगावी जाणे टाळावे. ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून आळीपाळीने रात्रगस्त घालावी. परिसरातील संशयास्पद हालचालींची तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.
घराच्या आजूबाजूचे आणि गल्लीतील पथदिवे रात्री सुरू राहतील याचीही काळजी घ्यावी. नागरिकांचा सहभाग घरफोडी रोखण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.“आपली सतर्कता, आपल्या घराची सुरक्षा!” आपत्कालीन परिस्थितीत ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे यांनी केले.





Total Users : 3715327