सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) दुष्काळाच्या संकटात बळीराजाच्या डोळ्यांसमोर उभं राहिलंय आणखी एक भयंकर संकट! शेतातील पीक हातचं गेल्यानंतर आता पोटच्या लेकरांप्रमाणे जपलेल्या जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करायची तरी कशी? या चिंतेने शेतकरी हवालदिल होण्याची शक्यता असतानाच ‘ग्रीन इंडिया मिशन’ने तब्बल ५ ते ७ हजार मुक्या जिवांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे!
बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांत दुष्काळाच्या संभाव्य झळा लक्षात घेऊन चारा-पाणी मदत अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या चारा उपलब्ध असला, तरी आगामी काळात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संकट दारात येण्याआधीच मदतीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
‘माणूस संकटात सापडला तर मदतीला धावणारे अनेक असतात; पण मुक्या जनावरांचा आक्रोश ऐकणार कोण?’ हाच सवाल समोर ठेवत ग्रीन इंडिया मिशनने सामाजिक बांधिलकीचा संकल्प केला आहे.
या अभियानातून मोकाट जनावरे, आर्थिक अडचणीत सापडलेले पशुपालक आणि गरजू शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी चारा, पाणी व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परिस्थितीनुसार मदतीचा विस्तारही करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.विशेष म्हणजे, जिल्ह्यातील गावागावांत, ग्रामपंचायत क्षेत्रांत आणि शहरांतील गरजू पशुपालकांपर्यंत मदत पोहोचविण्याचे नियोजन आहे.
या अभियानासाठी सचिन सावळे, एकनाथ दोंड आणि दिनेश गवई हे संपर्कप्रमुख असून, गरजू शेतकऱ्यांनी ९१७५६१०७१२ किंवा ९८८१६९८३८८ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुष्काळात माणसांसोबत मुक्या जिवांनाही जगण्याचा अधिकार आहे! ग्रीन इंडिया मिशनचा हा संकल्प प्रत्यक्षात उतरल्यास हजारो जनावरांना मोठा दिलासा मिळू शकतो. आता या महासंकल्पाची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, याकडे पशुपालकांचे लक्ष लागले आहे!






Total Users : 3639153