अंढेरा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) शासनाचा महसूल बुडवून विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्यांना अंढेरा पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे! सोमवारी, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता अंढेरा फाट्याजवळ केलेल्या नाकाबंदीत एकाच वेळी तब्बल पाच रेतीने भरलेले टिप्पर पोलिसांच्या जाळ्यात सापडले. तब्बल ९९ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अंढेरा पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सिद्धार्थ प्रियकर सोनकांबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल नितीन फुसे हे ठाणेदारांच्या आदेशानुसार अवैध व्यवसायांविरोधात गस्त घालत होते. याचदरम्यान सरंबा फाट्याकडून चिखलीच्या दिशेने विनापरवाना रेतीची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीवरून पोलिसांनी देऊळगाव राजा–चिखली मार्गावरील अंढेरा फाटा परिसरात, हॉटेल राजजवळ सापळा रचला. नाकाबंदी सुरू असतानाच रेतीने भरलेले पाच टिप्पर समोर आले. चालकांकडे रेती वाहतुकीचे परवाने मागितले असता, परवाने नसल्याचे समोर आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
कारवाईत कोणती वाहने सापडली?
१) MH-27-BX-1899 – जीवन महादू वाघ (१९), मुद्देमाल २० लाख ३४ हजार रुपये.
२) MH-28-BB-7798 – गणेश दिलीप इंगळे (२२), मुद्देमाल १७ लाख १२ हजार रुपये.
३) MH-28-BB-8683 – अनिकेत गजानन घोरपडे (२१), मुद्देमाल २२ लाख ४४ हजार रुपये.
४) MH-37-3-1623 – विजय रंगनाथ तारू (४०), मुद्देमाल १८ लाख ३४ हजार रुपये.
५) MH-28-BB-0178 – पवन विजय इंगळे (२२), मुद्देमाल २१ लाख ३४ हजार रुपये.
या पाचही चालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि गौण खनिजाशी संबंधित कायद्याच्या कलम २१(१), २१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईने अवैध रेती वाहतुकीचे गंभीर वास्तव समोर आणले असून, पुढील तपासातून आणखी काय उघड होणार, याकडे संपूर्ण चिखली तालुक्याचे लक्ष लागले आहे!






Total Users : 3638624