बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एकीकडे नवरात्रोत्सवात डीजे आणि रोषणाईचा भपका सुरू असताना, दुसरीकडे राज्यावरील कोरड्या दुष्काळाच्या सावटाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरातील एका मंडळाने सामाजिक बांधिलकीचा अनोखा वस्तुपाठ घालून दिला आहे. शहरातील म्हाडा कॉलनी परिसरातील म्हाडेश्वर नवदुर्गा उत्सव मंडळाने कोणताही अनावश्यक खर्च आणि डीजेचा दणदणाट टाळत, अत्यंत साध्या आणि प्रबोधनात्मक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करत आदिशक्तीची खरी पूजा बांधली आहे.
मंडळाने मंडपात केवळ देवीची स्थापना न करता, सामाजिक जागरुकतेचे फलक लावून मोठे प्रबोधन केले. यामध्ये स्त्रीभ्रूणहत्या रोखा, लेक वाचवा-लेक शिकवा, महिला सक्षमीकरण आणि स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवड आणि पाणी बचत, शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणे*
अशा विविध विषयांवर प्रभावी संदेश देण्यात आला.
▪️आरोग्य आणि ज्ञानाचा जागर!
या उत्सवाची सुरुवातच रक्तदान शिबिराने झाली. या नऊ दिवसांत किशोरवयीन मुली, गरोदर माता आणि इतर महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच, सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून महिला व मुलींसाठी वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी मार्गदर्शन, तर महिला व बालकल्याण विभागाकडून शासकीय योजना आणि महिला हक्कांवर प्रबोधन करण्यात आले.
▪️बळीराजासाठी मदतीचा हात!
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डीजे आणि इतर अनावश्यक खर्च टाळून वाचवलेली जास्तीत जास्त रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जमा करण्याचा संकल्प मंडळाने केला आहे. कार्याध्यक्ष नंदकिशोर काशीकर आणि पदाधिकारी निलेश डुकरे यांनी सांगितले की, “निसर्गाच्या संकटात सापडलेल्या बळीराजाच्या पाठीशी उभे राहणे, हिच आदिशक्तीची खरी सेवा आहे.”






Total Users : 3636447