खामगाव (हॅलो बुलढाणा न्यूज नेटवर्क) चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ नको, आजारावर वेळीच उपचार हवेत! याच उद्देशाने खामगावच्या सामान्य रुग्णालयात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष मोफत शल्यक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. आर्थिक अडचणींमुळे बालकांच्या उपचारांची चिंता करणाऱ्या पालकांसाठी हा उपक्रम दिलासादायक ठरला आहे.
या शिबिरात जीभेखालील पडद्यामुळे निर्माण होणारी अडचण (टंग टाय), शरीरावरील गाठी (सिस्ट) तसेच विविध आरोग्य समस्यांनी त्रस्त बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. आवश्यक उपचार आणि शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
लक्ष द्या पालकांनो! दुर्लक्ष ठरू शकते महागात!
मुलांना बोलताना, जीभ हलविताना किंवा अन्न गिळताना त्रास होत असेल, शरीरावर गाठ अथवा सूज दिसत असेल तर वेळ न दवडता शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्या.वेळीच निदान, मोफत उपचार आणि निरोगी बालपण! राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा जास्तीत जास्त पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.






Total Users : 3610293