spot_img
spot_img

बुलढाणा जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचा दणका! २३४ नमुने तपासले, १२ असुरक्षित!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी दिली.२३४ नमुने तपासले असता १२ असुरक्षित आढळल्याने खळबळ उडाली आहे.

सद्यस्थितीत बुलढाणा कार्यालयाकडे तीन अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत १०६ परवानाधारक आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे, तर १३७ छोट्या व्यावसायिकांची (नोंदणीकृत) तपासणी करण्यात आली आहे. जिल्हाभरातून एकूण २३४ नमुने गोळा करण्यात आले आहेत. त्यापैकी १२ नमुने असुरक्षित आढळले आहेत. एखाद्या अन्नपदार्थात रंगाची मात्रा ठरवून दिलेली असते, त्यापेक्षा जास्त प्रमाणात रंगाचा वापर केलेला असणे. तसेच आईस्क्रीम, मावा या नावाने विकल्या जाणाऱ्या पदार्थात पामतेलाचा वापर केलेला असेल तर तो लोकांच्या आरोग्याच्या हितासाठी असुरक्षित म्हणून घोषित केला आहे. तसेच
८ अन्नपदार्थ कमी दर्जाचे असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत, तर २ अन्नपदार्थ चुकीच्या दर्जाचे/लेबलचे असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत.

▪️१२ परवाने निलंबित, ४ व्यवसाय बंद!

तपासणी दरम्यान ४ जणांना जागेवरच व्यवसाय थांबवण्याचे निलंबन आदेश दिले होते. काहींना सुधारणा नोटीस देण्यात आली होती. त्याचे पालन न करणाऱ्यांचे परवाने निलंबित केले आहेत. आतापर्यंत एकूण १२ जणांचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले असून, त्यापैकी ३ आस्थापनांनी पूर्तता केल्याने त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
एकूण ७१ हॉटेल-रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये बुलढाणा शहरातील दोन ठिकाणी अन्नपदार्थात रंगाचा वापर झाल्याने त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्यापैकी एका रेस्टॉरंटचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

▪️प्रशासनाचे आवाहन

अन्न व्यवसाय चालकांना प्रशासनाने कडक शब्दात सांगितले आहे की, “ज्या अन्नपदार्थात रंग वापरण्याची गरज नाही, तिथे अजिबात रंग वापरू नका. रंगामुळे कोणतेही पोषणमूल्य मिळत नाही, फक्त पदार्थ दिसायला आकर्षक दिसतो.” तसेच नागरिकांनीही हॉटेलवाल्यांना “रंग टाकून देऊ नका” अशी मागणी करावी. अन्नपदार्थ ताजे असावेत, त्याची बिले असावीत आणि कमी दर्जाचे पदार्थ वापरू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!