spot_img
spot_img

“आम्हाला भिकारी समजता का? आम्ही देशाचे अन्नदाते आहोत!” पाच हजाराची भीक नको, हेक्टरी १ लाख द्या – रविकांत तुपकरांचा सरकारला थेट इशारा

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एकीकडे जिल्ह्यातील १४४८ गावांतील ७.१८ लाख हेक्टरवरील पीक दुष्काळाने करपल्याचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, अहवाल दोन दिवसांत शासनाकडे जाणार आहे. दुसरीकडे राज्य सरकारने दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांच्या खात्यात ५ हजार रुपये टाकण्याची घोषणा करताच शेतकरी अक्षरशः पेटून उठला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सरकारला जाब विचारला आहे.

ते म्हणाले की,
“दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयाची मदत देऊ असं राज्य सरकारनं सांगितलं, ही निव्वळ शेतकऱ्यांची थट्टा आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर हा मीठ चोळण्याचा प्रकार आहे. पाच हजार रुपये देता म्हणजे तुम्ही आम्हाला काय भिकारी समजता का? आम्ही काय भिकारी आहोत का?” अरे आम्ही देशाचे अन्नदाते आहोत. आम्ही पोशिंदे आहोत. आम्ही नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल – धतुरा? आमच्या भरवशावर तुम्ही आहात लक्षात ठेवा. “पाच हजार रुपयात काय होणार आहे हो? आम्हाला हेक्टरी खर्च एक लाख रुपये आलेलं आहे. त्यामुळे हेक्टरची मर्यादा न ठेवता प्रतिहेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे, असे तुपकर म्हणाले.

▪️सरकारला थेट आव्हान!

रविकांत तुपकर यांनी सरकारला थेट आव्हान दिलं आहे की, पाच हजार रुपयाची मदत आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही आमच्याकडे येऊन राहा वर्षभरासाठी, त्याच्यात तुम्ही दिवाळी करा. असलं हे थोतांड बंद करा. शेतकऱ्याला जर तुम्ही गृहीत धरण्याचा प्रयत्न करत असाल तर शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल.”
हा प्रश्न फक्त एका शेतकऱ्याचा नाही, तर ५ लाख ८६ हजार बाधित खातेदारांचा आक्रोश आहे. पंचनामे पूर्ण होऊनही जर दिवाळीसारख्या सणाला फक्त ५ हजार रुपये हातात पडणार असतील, तर शेतकऱ्याची दिवाळी काळीच होणार आहे. पाच हजाराची मदत मान्य नाही. हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळात या सरकारच्या विरोधात उभं होणार आहे,असेही तुपकर म्हणाले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!