पातूर,बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिक्षक मतदारसंघात दुष्काळाचे चटके बसत असताना महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारात पंचतारांकित बैठकांचा आणि महागड्या भोजनावळींचा थाट सुरू आहे. सामान्य जनता आर्थिक संकटाशी झुंज देत असताना निवडणूक प्रचारासाठी उभा केलेला हा खर्चिक बडेजाव आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
महायुतीची मोहर बसल्यानंतर सरनाईक यांच्या प्रचाराचा वारू चौखूर उधळला आहे. गेल्या तीन दिवसांत विविध शहरांमध्ये आलिशान हॉटेलांत बैठका आणि भोजनावळी आयोजित करण्यात आल्या आहेत. अमरावतीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदार, मंत्री आणि नेत्यांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. नाश्त्याच्या एका प्लेटसाठी १,८०० रुपये मोजावे लागणाऱ्या ठिकाणी प्रचाराच्या बैठकांचा रतीब सुरू आहे.
शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मैदानात उतरलेल्या उमेदवाराच्या प्रचाराला एवढा महागडा थाट कशासाठी? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खर्चाला आवर घालण्याऐवजी आलिशान व्यवस्थांवर भर का? शिक्षकांच्या प्रश्नांचा हिशेब देण्याची वेळ असताना प्रचारातील मेजवान्यांचीच चर्चा होणे अनेक प्रश्न निर्माण करते.
या हॉटेलांमध्ये मतदार आणि शिक्षणसंस्था चालकांशी संवादासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध आहे. मात्र संवादासाठी पंचतारांकित सुविधांची गरज किती, हा प्रश्न कायम आहे. निवडणुकीतील संपर्क आणि आदरातिथ्य यांवर होणाऱ्या खर्चाबाबतही पारदर्शकता आवश्यक आहे.
दरम्यान, सरनाईक यांच्या शिवाजी संस्थेतील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लावण्यात आले आहे. नियमित कामांसोबत प्रचाराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. या अतिरिक्त कामासाठी ज्यादा मानधन देण्यास नकार मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. नेत्यांच्या बैठकीसाठी महागड्या सुविधा आणि प्रचार राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त मोबदल्याला नकार, हे चित्र खटकणारे आहे.
दुष्काळग्रस्त भागातील शिक्षक मतदारांना आपल्या प्रश्नांवर ठोस भूमिका आणि कामाचा लेखाजोखा अपेक्षित आहे. महागड्या बैठका त्या अपेक्षांची जागा घेऊ शकतात काय? पंचतारांकित प्रचाराचा थाट उभा करताना शिक्षकांच्या प्रश्नांवर नेमके काय केले, याचे उत्तर सरनाईकांना द्यावे लागणार आहे.






Total Users : 3606648