spot_img
spot_img

“एक बार मैने कमिटमेंट कर दी तो मै किसी की नही सुनता” – मेहकरमध्ये शिंदे यांचा शेतकऱ्यांना शब्द, सभेतच ‘नियम बाजूला’ वक्तव्यावर चर्चा

मेहकर (हॅलो बुलढाणा) मेहकरच्या डी. पी. रोडवरील रिलायन्स मॉलसमोर भरलेला दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळावा… हजारो शेतकरी, महिला, तरुण… आणि व्यासपीठावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघाती आवाज घुमला

“एक बार मैने कमिटमेंट कर दी तो मै किसी की नही सुनता!” सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला. पण त्यानंतर शिंदे यांनी जे पुढचं वाक्य बोलले, त्यावर सभेतच चर्चा रंगली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी “नियम बाजूला ठेवण्याची” भाषा एका सत्तेत असलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी का वापरली? हा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत राहिला.

“एवढंच सांगतो की दिलेला शब्द पाळणारी शिवसेना आहे. म्हणून तीच कमिटमेंट मी तुम्हाला द्यायला आलोय. तुम्हाला जेवढी मदत लागेल ती करणार. कुठल्याही थराला जाऊन करणार. कुठल्याही पातळीवर जाऊन करणार. अगदी नियम बाजूला ठेवावे लागले तरी ठेवणार, पण शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, हा शब्द देतो.”
हात वर करून, बोट दाखवून, शिंदे वारंवार हेच सांगत होते. “शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही.”
मेहकर तालुक्याने यंदा पावसाची मोठी झळ सोसली आहे. अनेक ठिकाणी पेरण्या वाया गेल्या, सोयाबीन, कापूस, तूर हातातून गेली. पाण्याअभावी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, कर्जाचा डोंगर… यातून शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या दौऱ्याकडे मेहकरच्या शेतकऱ्यांनी आशेने पाहिले होते. “साहेब येतील आणि काहीतरी ठोस घोषणा करतील,” हीच अपेक्षा सगळ्यांची होती. शिंदे समर्थक आणि महायुतीच्या नेत्यांच्या मते, या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट आहे.
दुष्काळाच्या काळात मदत देताना सरकारी फाईल, किचकट अटी, कागदपत्रांची अडवणूक यात शेतकऱ्यांना अडकवून ठेवायचं नाही. मदत तातडीने, थेट शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचवण्यासाठी आवश्यक तिथे नियम शिथिल केले जातील. माणूस मोठा, नियम नंतर, हाच संदेश शिंदे यांनी दिला, असं समर्थक सांगतात.
“मुख्यमंत्री असताना देखील शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी हाच धडाका दाखवला होता. आता उपमुख्यमंत्री म्हणूनही तीच भूमिका आहे,” अशी प्रतिक्रिया सभेतील एका कार्यकर्त्याने दिली. दुसरीकडे, सभेनंतर झालेल्या चर्चेत वेगळा सूरही उमटला.सत्तेत असलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत “नियम बाजूला ठेवू” असे म्हणणे योग्य आहे का? मदतीसाठी नियम शिथिल करणे वेगळे आणि नियमच बाजूला ठेवणे वेगळे, असा युक्तिवाद काहींनी केला.मदतीचे निकष काय असतील? कोणत्या नियमांना सूट मिळेल? ही सूट सर्व शेतकऱ्यांना समान मिळेल का? या प्रश्नांची उत्तरे सरकारने लेखी आदेशाने द्यावीत, अशी मागणी आता होऊ लागली आहे. कारण जाहीर सभेतील घोषणा आणि प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात पडणारी मदत यात अनेकदा तफावत राहते, असा अनुभव शेतकऱ्यांनी यापूर्वी घेतला आहे.

▪️शेतकऱ्यांच्या मनात काय?

सभेला आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया मात्र आशादायी होत्या. “साहेबांनी शब्द दिला आहे, आता तरी मदत मिळेल,” असे एका वयोवृद्ध शेतकऱ्याने सांगितले. तर दुसऱ्या एका तरुण शेतकऱ्याने सांगितले, “आम्हाला भाषण नको, मदत हवी. कर्जमाफी, पिकविमा, दुष्काळी अनुदान हे प्रत्यक्षात मिळालं तरच आमचा विश्वास बसेल.”शिंदे यांनी केवळ आश्वासन दिले नाही, तर त्याच मंचावरून विविध विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन आणि लोकार्पणही केले. सेवासंकल्प अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही या कार्यक्रमात झाला.

▪️आता पुढे काय?

शिंदे यांचे हे ‘कमिटमेंट’ वक्तव्य आता मेहकरसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता खरी कसोटी आहे ती कृतीची. शिंदे यांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात किती उतरतो? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी मिळते? किती मिळते? आणि कोणत्या नियमात सूट मिळते? याचे उत्तर येणाऱ्या काही दिवसांत सरकारी आदेशातून मिळेल, याकडे मेहकरच्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!