संग्रामपूर (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) पाच एकरांत तूर उभी होती. या पिकातून घरखर्चाला हातभार लागेल, अशी आशा होती. मात्र ऐन खरीप हंगामात पावसाने दडी मारली आणि तुरीला शेंगाच आल्या नाहीत. अखेर चांगेफळ बु. येथील शेतकरी सत्यभामाबाई रामदास म्हसाळ यांनी शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी उभ्या पिकात मेंढ्यांचा कळप चारण्यासाठी सोडला.
चांगेफळ बु. शिवारातील गट क्रमांक ५७ मध्ये म्हसाळ यांनी पाच एकरांवर तुरीची लागवड केली होती. बियाणे, मशागत, पेरणी, खते आणि औषध फवारणीसाठी खर्च केला. मात्र पावसाच्या प्रदीर्घ खंडाने हंगामाचा हिशेबच उलटवला. तुरीतून उत्पन्न मिळण्याची आशा मावळली आणि लागवडीसाठी घातलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता उरली नाही.
शेतात पीक दिसत होतं, पण त्यातून विकायला तूर मिळणार नव्हती. अशा अवस्थेत पाच एकरांतील पीक चाऱ्यासाठी सोडण्याची वेळ म्हसाळ यांच्यावर आली. या एका शेतातलं चित्र पावसाच्या खंडाने परिसरातील शेतकऱ्यांचं आर्थिक गणित किती बिघडलं, हे दाखवून गेलं.
पीक हातचं गेलं, मदत खात्यात कधी?
हंगामासाठी केलेला खर्च अंगावर असताना नुकसानभरपाईची प्रतीक्षा किती दिवस करायची, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. शासनाने जाहीर केलेली दुष्काळी मदत, नुकसानभरपाई आणि पीकविम्याची रक्कम विनाविलंब थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी चांगेफळ परिसरातून होत आहे.






Total Users : 3834870