चिखली (हॅलो बुलढाणा) पिकांचे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांनी आता चाऱ्याअभावी पशुधनही गमवायचे का? एका बाजूला जनावरे नसलेल्या शेतकऱ्यांकडील सोयाबीनचे कुटार पडून आहे, तर दुसरीकडे पशुपालकांसमोर चाऱ्याचे संकट उभे आहे. शासनाने हे कुटार योग्य दराने खरेदी करून पशुधन असलेल्या शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक आणि जिल्हाध्यक्ष देविदास कणखर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
चिखली तहसीलदारांमार्फत निवेदन देताना पोतडीभर कुटाराचा नमुनाही सादर करण्यात आला. ‘कुटार असलेल्याला मोबदला, पशुधन असलेल्याला चारा’ या सूत्रावर गावागावांत ‘कुटार बँक’ आणि साठवण केंद्रे उभारण्याची मागणी संघटनेने केली.
काही शेतकरी उपयोगाअभावी कुटार जाळून टाकतात. हा पशुखाद्याचा अपव्यय रोखण्यासाठी शासनाने तातडीने संकलन सुरू करावे. जिल्ह्यातील चारा वाहतूक व विक्रीवरील निर्बंधांमुळे उपलब्ध कुटार वाया जाण्याची शक्यताही निवेदनात मांडण्यात आली.
चारा छावण्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी कुटार खरेदी आणि चारा अनुदान थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात द्यावे. यातून शेतकऱ्यांना मोबदला, जनावरांना चारा आणि सरकारी निधीची बचत होईल, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. पिके गेली; आता पशुधन वाचविण्यासाठी तातडीचा निर्णय घ्या, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी उद्धव थुटे पाटील, नितीन राजपूत, अरुण नेमाने, गजानन पंडित, मुरलीधर येवले आणि गजानन कुटे उपस्थित होते.




Total Users : 3577798