spot_img
spot_img

दुष्काळाने शेतकरी होरपळला, नेते मात्र श्रेयासाठी भिडले! “शेतकऱ्यांच्या जळत्या चितेवर राजकारणाची भाकरी भाजू नका” – प्रवीण गीते यांचा घणाघात!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्यात दुष्काळाच्या तीव्र झळांनी शेतकरी अक्षरशः होरपळत असताना, दुष्काळ जाहीर झाल्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये सुरू झालेली चढाओढ संतापजनक असल्याचा घणाघात प्रवीण गीते यांनी केला आहे. “आमचं घर जळतंय, आमच्या वेदना आम्हालाच माहीत आहेत; शेतकऱ्यांच्या जळत्या चितेवर राजकारणाची भाकरी भाजू नका,” अशा शब्दांत त्यांनी राजकीय श्रेयवादावर हल्लाबोल केला.

 

पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके डोळ्यांसमोर करपली. उत्पादनावर केलेला खर्च मातीमोल झाला, कर्जाचे ओझे वाढले आणि आता पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्याऐवजी काही नेते आणि त्यांचे समर्थक सोशल मीडियावर ‘दुष्काळ आम्हीच जाहीर करून आणला’ अशा पद्धतीने श्रेयासाठी स्पर्धा करत असल्याचा आरोप गीते यांनी केला.

दुष्काळ हा प्रसिद्धीचा विषय नाही; तो शेतकऱ्यांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे. फोटोसेशन, पोस्टरबाजी आणि श्रेयवाद थांबवा; प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यात टाका,असे त्यांनी स्पष्ट केले.

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, पात्र शेतकऱ्यांना कर्ज व वीजबिलासह उपलब्ध सवलती तत्काळ लागू कराव्यात, पाणीटंचाईच्या गावांत टँकर सुरू करावेत आणि जनावरांसाठी चारा व आवश्यकतेनुसार छावण्या उभाराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करू नका. श्रेयाची लढाई थांबली नाही आणि प्रत्यक्ष मदत मिळाली नाही, तर शेतकऱ्यांचा वाढता संताप सत्ताधाऱ्यांसह सर्वच राजकीय नेत्यांना महागात पडू शकतो, असा इशाराही प्रवीण गीते यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!