चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) चिखली नगर परिषदेच्या भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी आणि लसीकरण मोहिमेतील कागदपत्रे आता प्रशासनासमोर गंभीर प्रश्न उभे करत आहेत. सन २०२६-२७ मध्ये ‘वेदिका अॅनिमल वेलफेअर एजन्सी’ने २७ मे ते १३ जून या अवघ्या १८ दिवसांत तब्बल ४५० कुत्र्यांना पकडले, त्यांच्यावर निर्बीजीकरण केले, लसीकरण केले आणि पुन्हा मूळ ठिकाणी सोडले, अशी नोंद असल्याचा दावा माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रांच्या आधारे करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे प्रति श्वान १,९२५ रुपये या दराने या ४५० कुत्र्यांसाठी तब्बल ८ लाख ६६ हजार २५० रुपयांचे देयक तयार झाल्याची माहिती आहे. एवढ्या मोठ्या संख्येने शस्त्रक्रिया खरोखर झाल्या असतील, तर त्यांचे दिवसनिहाय ऑपरेशन रजिस्टर, पशुवैद्यकांची नावे, औषधांचा वापर, कुत्रे पकडल्याचे व सोडल्याचे GPS पुरावे, शस्त्रक्रियेनंतरच्या देखभालीची नोंद आणि बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट कुठे आहे? हा प्रश्न आता थेट नगर परिषद प्रशासन आणि मुख्याधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
कागदावर परिसरनिहाय ‘परफेक्ट’ आकडे!
बस स्टॉप ३१, वाल्मीकी नगर ३०, जुने गाव २९, गांधी नगर व सैलानी नगर प्रत्येकी २७, कुंडलिक नगर व माळीपुरा प्रत्येकी २६, गजानन नगर, संभाजी नगर व जिजाऊ नगर प्रत्येकी २५ अशा प्रकारे विविध भागांत २१ ते ३१ कुत्र्यांची संख्या दाखवण्यात आली आहे. मग या प्रत्येक कुत्र्याची स्वतंत्र ओळख नोंद कुठे? फोटो कुठे? शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतरची नोंद कुठे?
‘नगरसेवकांच्या मागणीनुसार’ म्हणजे नेमकं काय?
देयक प्रक्रियेत ‘नगरसेवकांच्या मागणीनुसार’ असा शेरा असल्याचा दावा करण्यात येत असल्याने या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. नगरसेवकांची मागणी नेमकी कोणती होती? कोणत्या नगरसेवकांनी ती केली? नसबंदी झालेल्या कुत्र्यांची पडताळणी त्यांनी केली होती का? आणि बिल मंजुरीमध्ये त्या शेर्याचे नेमके महत्त्व काय होते?
लोकप्रतिनिधींवर थेट दोष निश्चित करण्याआधी या सर्व बाबींची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे; मात्र संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करणे ही नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी आहे.
सगळ्यात मोठा धक्का – बायोमेडिकल वेस्टचा हिशेबच नाही?
सचिन राठी यांनी शस्त्रक्रियेनंतर निर्माण झालेल्या बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट कुठे आणि कशी लावण्यात आली, याची माहिती नगर परिषदेकडे मागितल्याचे सांगण्यात येते. मात्र या विषयाची माहिती खरेदी विभागात उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. मग सिओ साहेब, प्रश्न साधा आहे ४५० शस्त्रक्रिया झाल्या तर त्यातून निर्माण झालेल्या वैद्यकीय कचऱ्याची नोंद कुठे गेली?
१८ दिवसांत ४५० ऑपरेशन करणे तांत्रिकदृष्ट्या कितपत शक्य होते, याचा निर्णय केवळ आकड्यावरून होऊ शकत नाही. त्यासाठी एजन्सीकडे किती पशुवैद्यक होते, किती ऑपरेशन टेबल्स, किती केनेल्स, रोज किती शस्त्रक्रिया झाल्या आणि प्रत्येक कुत्र्याची शस्त्रक्रियेनंतरची देखभाल किती काळ झाली, याची कागदोपत्री तपासणी आवश्यक आहे.
सिओ साहेब, आता गोलमोल उत्तर नको! ४५० कुत्र्यांचा पूर्ण पुरावा जनतेसमोर ठेवा!
करदात्यांच्या लाखो रुपयांचा विषय असल्याने या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी, सर्व देयके व ऑपरेशन रेकॉर्ड सार्वजनिक करणे आणि अनियमितता आढळल्यास एजन्सी, जबाबदार अधिकारी किंवा इतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
टीम ‘हॅलो बुलढाणा’चा सवाल एवढाच आहे की कुत्र्यांची नसबंदी प्रत्यक्षात झाली की फक्त कागदांचीच ‘सर्जरी’ करण्यात आली? याचा उत्तर नक्कीच ‘हॅलो बुलढाणा’ घेऊन राहीलचं यात तीळ मात्र शंका नाही












Total Users : 3472338